Thursday, 26 November 2015
Friday, 13 November 2015
कोकणचा मेवा
सरंगा, पापलेट, कर्ली, सौंदाळे, पेडवे या माशांच्या डिशेस सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अगदी रुचकर आणि मुबलक. मालवणची कोळंबी अगदी पारंपरिक पद्धतीनं घरगुती केलेली एक वेगळा आनंद देणारी. मालवणमध्ये समुद्रात मिळणाऱ्या कोळंबीपेक्षा खाडीत मिळणारी कोळंबी तव्यावर थोड्याशा तेलाते परतून करतात. या कोळंबीला नेहमीच्या हॉटेलमधून,तसंच पंचतारांकित हॉटेलांतूनही मागणी आहे.
"बहु असोत सुंदर, संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्रदेश हा ।' हे महाराष्ट्राचं वर्णन यथार्थ आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकणाचा भाग महाराष्ट्राचं नंदनवनच आहे. नयनरम्य सागरकिनारे, ऐतिहासिक सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ले आणि रसनानंद देणाऱ्या पाककलाकृती, ही कोकणची ठळक वैशिष्ट्यं. कोल्हापूर सोडून घाट उतरताना हिरवागर्द निसर्ग मनाला भुरळ घालतो. सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा, वेंगुर्ला या परिसरावर गोवा आणि कर्नाटकाची छाप उमटलेली दिसते; तर गगनबावडा, फोंडा, कणकवलीवर कोल्हापुरी रांगडी छाप जाणवते. मालवणचा ढंग मात्र यापेक्षा वेगळा ठळकपणे उठून दिसणारा, तो मालवणी बोली आणि मालवणी पाककलाकृतीमुळं. कणकवलीत पाहुणे म्हणून गेलात तर म्हणतील "येवा! आज रवतालास?' पण मालवणात आलात तर विचारतील, "आज रवतालात की जातालात?' मग मासे, मटणावर ताव मारण्यासाठी आलेला पर्यटक इथल्या सागरकिनाऱ्यावर एक दिवसाचा तरी मुक्काम करतोच. जसं "पिकतं तिथं विकत नाहीत' तसं आख्ख्या सिंधुदुर्गात खास मालवणी जेवण मिळणं दुरापास्तच; पण आश्चर्य म्हणजे अगदी लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मालवणी वडे सागोती, सोलकढी यांसारख्या अस्सल मालवणी पाककलाकृती मिळतील. मालवणी बोली भाषा आणि मालवणी पाककलाकृती सातासमुद्रापार रसिकांच्या रसनेवर केव्हाच पोचल्या आहेत; परंतु मालवणच्या तारकर्ली बीच रिसॉर्टवर आयुष्यातील निदान एक रात्र तरी सागरसान्निध्यात राहिल्याशिवाय रसनानंद पूर्ण व्हायचा नाही. शाकाहारी जिभेलाही मालवणात आल्यानंतर मांसाहाराची चटक सहज लागू शकेल. बारा महिने 16 ते 22 सेल्सिअसपर्यंत उष्ण आणि दमट हवामानात, हिरव्यागर्द वनराईत, भातशेती आणि समुद्रकिनाऱ्यावर दररोजचा आहार म्हणजे भात आणि मासे. इथल्या 99 टक्के घरांतून दुपारी दीड-दोनपर्यंत माशाची कढी शिजलेली असते. घमघमाट सुटलेला असतो आणि या अपूर्व स्वादानंच जिभेला पाणी सुटतं. बाजारातून मासे घरी येण्याचीच वाट घरची मंडळी पाहत असतात. बांगडे, पेडवे, सौंदाळे, कर्ली, सरंगा, पापलेट, मोरी हरतऱ्हेच्या माशांची रेलचेल असते. हे रुचकर जेवण गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत घरोघरी असते. नारळ, मसाला अगदी काटकसर न करता वापरला जातो. त्यातूनही सोमवार, गुरुवार, शनिवार हे शाकाहारी दिवस पाळणारेही असतात. मालवणात नवीन आलेल्या पाहुण्यासाठी खास पाककृती म्हणजे मोरी माशाचं मटण. मोरी हा आकारानं मोठा मासा. बाजारातून साफसूफ करून मालवणी मसाल्यानं त्याला अधिक टेस्टी बनवलं जातं. नव्यानं आलेल्या पाहुण्याच्या तर ही चव कायमची स्मरणात राहून जाते. मालवणच्या पूर्वेला चिवला बीच आणि तारकर्लीला कॉटेज हॉटेल्स, घरगुती खानावळी आणि आता बऱ्यापैकी पुष्कळ हॉटेल्स आहेत. अजूनही पंचतारांकित वगैरे अद्ययावत सुविधा नसल्या, तरी ही हॉटेल्स मात्र ऐसपैस आणि एकदम स्वच्छ. बिसलरी वॉटरपेक्षाही येथील विहिरीच्या पाण्याची चव एकदम सुरेख! नारळाच्या झावळ्यांखाली, आमराईत, हवेशीर ओपन हॉलमध्ये; तर तारकर्लीला बीचवर पायाखाली मऊ रूपेरी वाळू, समोर सागरी लाटांचं नृत्य, हवेतून जाणवणारा उष्मा, मध्येच वाऱ्याची झुळूक आणि त्याबरोबर वडे-सागोतीचा स्वाद. लज्जतदार, रुचकर हे वडे म्हणजे तांदूळ आणि उडदाच्या पिठाच्या जाडसर पुऱ्या आणि गावठी कोंबडीचं मटण. खरं तर हा पदार्थ मालवणी संस्कृतीमध्ये खास जावयासाठी कौतुकानं केला जातो. अगदी पाट्यावर ताजा मसाला वाटून. आता मात्र येथील हॉटेलात पर्यटकांसाठी स्पेशल मालवणी डिश म्हणून दिला जातो आणि आता तर वडे-सागोती थेट लंडनपर्यंत पोचला आहे, मालवणी डिश म्हणून. पर्यटकांना खरी मौज लुटायची असते ती येथील फिश करी आणि फ्राय फिशची. तशा मालवणी फिश डिशेस शंभर-दोनशेपेक्षाही अधिक आणि विविध पद्धतीच्या आहेत. फक्त बांगड्याच्याच 15 ते 20 प्रकारच्या पाककलाकृती आहेत. मालवण किनाऱ्यावरील बांगडा अतिशय रुचकर. फिश करी, फ्राय फिश बांगड्यामध्ये एकच मधोमध काटा असतो. ताज्या नारळाच्या जाडसर चटणीत बांगड्याचं तिकलं, बांगड्याची कडी, तीन-चार दिवस टिकणारे वाफवलेले बांगडे. ही पाककलाकृती मात्र अगदी खेड्यामध्येच चाखायला मिळेल. पावसाळ्यात मासेमारी बंद झाल्यावर भात आणि निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा, कुर्ल्याचं सांबार; परंतु हॉटेल संस्कृतीत मात्र या डिशेस विरळाच. सरंगा, पापलेट, कर्ली, सौंदाळं, पेडवं या माशांच्या डिशेस सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत अगदी रुचकर आणि मुबलक. मालवणची कोळंबी अगदी पारंपरिक पद्धतीनं घरगुती केलेली एक वेगळा आनंद देणारी. मालवणमध्ये समुद्रात मिळणाऱ्या कोळंबीपेक्षा खाडीत मिळणारी कोळंबी तव्यावर थोड्याशा तेलामध्ये परतून करतात. या कोळंबीला हॉटेलमधून, पंचतारांकित हॉटेलातूनही मागणी आहे. मालवणी मुलखात मांसाहारी जेवणाइतकेच शाकाहारी जेवण रुचकर. मालवणी सोलकढीनं पंचतारांकित हॉटेलातही अव्वल स्थान मिळवलं आहे आणि लग्नसमारंभात दुपारच्या वेळी फणसाच्या भाजीची चव तशी सहजासहजी एखाद्या मालवणी हॉटेलातही मिळणार नाही. कोवळ्या फणसाची खोबरं घालून केलेली खुसखुशीत भाजी, पिकलेल्या फणसगऱ्याची भाजी, केळीच्या कोक्याची भाजी, कच्च्या केळीची बटाट्यासारखी उकडून केलेली भाजी, येथील हिरव्या वालीची भाजी आणि अस्सल मालवणी शेवग्याच्या शेंगांची, बटाट्याची भाजी शाकाहारात रुची वाढवतात. एरवी पावसाळ्यात कडधान्यावरच शाकाहारी जेवण. त्यातही खोबरे आणि मसालेदारपणा अधिकच. तांदळाचं घावन, आंबोळी पेज आणि चटपटीत न्याहरीला काकडी रवा आणि गुळाची नवसोळी- याला धोंड असेही म्हणतात- खापरोळी, अळूच्या वड्या हे पदार्थ घरगुती जेवणातच मिळतात. कोकणातील शाकाहारी जेवणाचा थाट असतो हिरव्यागार केळीच्या पानावर. चटण्या, लोणची, पापड, गरम भात, त्यावर कोकणी पद्धतीची डाळ. मिरच्यांची फोडणी दिलेली; पण त्याबरोबर नारळ आणि कोकमची सोलकढी येथे रोजच्या जेवणात अगदी माशांइतकीच सवयीची. सोलकढीशिवाय जेवणाची सांगता व्हायची नाही. शेवटी भाताबरोबर सोलकढी आणि त्यानंतर तृप्तीचा ढेकर! बस्स! या सोलकढीची चव जिभेवर बराच वेळ घोळत राहते आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांना जेवणासाठी पुनःपुन्हा येण्याचं आग्रहाचं निमंत्रण देते. पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर सप्टेंबरपासून ते मेपर्यंत कोकणातला निसर्ग सर्वांनाच खुणावत असतो. मालवण, तारकर्ली, आचरा, धामापूर, नेरूर आणि अगदीच कोकण सवयीचे झाले, तर येथील कासारटाका. धामापूरच्या तलावाच्या काठावर तळ्याच्या चवदार पाण्यात तीन दगडांची चूल मांडून केलेल्या मटण पार्टीला आता जवळपासचे पर्यटक खूपच गर्दी करतात. येथील हिरवीगर्द झाडी, धामापूरचा तलाव, भगवतीमंदिर आणि स्वतः बनवलेल्या जेवणाचा आस्वाद... बस्स! त्यासाठी मात्र एकदा प्रत्यक्ष मालवण कासारटाक्याला यायलाच हवं! |
Subscribe to:
Posts (Atom)